मुंबई | Deepak Kesarkar On Narayan Rane – शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणेंनी आखल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले असून याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी दीपक केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जातं आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म कसा वापरुन देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.
पुढे केसरकर म्हणाले, मला कोणीही सांगितलं नव्हतं तरी मी स्वतःच्या संपर्कानं पंतप्रधानांशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला व्यवस्थित प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा संपर्क सुरु झाला. त्यानंतर त्यांची भेटही झाली. त्यावेळी मला पंतप्रधानांबाबत हे कळालं की कुटुंब प्रमुख कसा असावा? त्यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबियांप्रती असलेलं प्रेम प्रतित होत होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्व देतो. त्याचवेळी ते आपल्यापदाचा त्याग करणार होते.
पण ते मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार होते. ही गोष्ट फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मलाच माहिती होती. पण मधल्या काळात भाजपच्या 12 लोकांचं निलंबन झालं होतं. त्यावेळी भाजपकडून निरोप आला होता की आपली बोलणी सुरु आहे आणि असं निलंबन योग्य नाही. दरम्यान, नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबली, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.