“मी प्रत्यक्ष नारायण राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी नाही, कारण तेवढा मी सिनिअर आहे”

मुंबई | Deepak Kesarkar On Nilesh Rane – शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (शुक्रवार) राणे पुत्रांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं. यामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असेल तर मातोश्रीवर भांडी घासावी असं म्हटलं होतं. यावर केसरकर यांनी बोलताना म्हटलं आहे की, नारायण राणेंच्या मुलानं ट्वीट केलं की उद्धव ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असेल तर मी मातोश्रीवर भांडी घासावी. हा माझा अपमान आहे. यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या एकाही शिवसैनिकाला निषेध करावासा वाटला नाही, असं केसरकर म्हणाले. 

केसरकर म्हणाले, राणेंची मुलं कशी बोलतात याची काळजी घेण्याची जबाबदारी नारायण राणेंची आहे. नारायण राणेंशी माझा वाद नाही, त्यांचे कार्यकर्ते जे वागतात त्यावर आक्षेप आहे. राणे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी जर राणेंसोबत काम करायचं असेल तर मी प्रत्यक्ष राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलेन. कारण तेवढा मी सिनिअर आहे. वयाने सिनिअर आहे, जवळ जवळ राणे साहेबांच्या वयाचा आहे. नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. ज्या प्रकारे त्यांचे खालचे कार्यकर्ते वागतात, त्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे. ज्याक्षणी कार्यपद्धती सुधारेल, माझा काहीच वाद राहणार नाही. नारायण राणे यांच्यातील मॅच्युरिटी अनेक वर्ष काम केल्यामुळं आहे. ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुणाशी बोलावं असं माझं मत नाही.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं ही भूमिका मी सतत मांडत राहिलोय. पण किती दिवस वाट बघायची याला मर्यादा आहे. एकत्र येण्याच्या भूमिकेला रिस्पॉन्स  द्यायचा की नाही हे ठाकरेंनी ठरवायचं आम्ही वाट बघितली आता जनतेच्या कामाला लागलोय.  पुर्ननियुक्त्या आणि पक्षातील इतर बाबींविषयी एकनाथ शिंदेच निर्णय घेतील आणि बोलतील, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे. 

Sumitra nalawade: