“जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात”

मुंबई | Deepak Kesarkar On Sharad pawar – शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात  आलं आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला आहे. 

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं आहे. तसंच शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असंही पवारांनी सांगितलं होतं असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर केलं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

पुढे केसरकर म्हणाले, अडीच वर्षात राष्ट्रवादीला टाॅनिक मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेत्यांकडून तसं जाहीरपणे सूतोवाचही केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या पालखीचे भोई होणे शिवसैनिकांना पटणार आहे का, याचा विचार शिवसैनिकांनी करावा असं आवाहन केसरकरांनी केलं आहे. 

 

Sumitra nalawade: