“उद्धव ठाकरे यांना आता शरद पवार जवळचे झालेत अन्…”

मुंबई | Deepak Kesarkar On Uddhav Thackeray – उद्धव ठाकरे यांना शरद पवार हे जवळचे झाले असून आम्ही त्यांना दूरचे झाले असल्याची खंत शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना शरद पवार हवेत की आपले शिवसैनिक हवे याचा निर्णय घ्यायचा असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं आहे.

आज (सोमवार) सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी दीपक केसरकरांनी बोलताना म्हटलं आहे की, कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार साहेब त्यांना राजीनामा देऊ नका असं सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नसल्याचंही केसरकर यांनी म्हटलं आहे. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या मित्रपक्षाने एकनाथ शिंदे आणि आमच्या इतर नेत्यांवर भाष्य करू नये असेही केसरकर यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. 

   

Sumitra nalawade: