मुंबई | Deepak Kesarkar On Uddhav Thackeray – मोदी सरकारनं नामिबिया देशातून 8 चिते आणल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चिता सरकार म्हणायचं का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला होता. त्यांच्या याच टीकेला आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी ते म्हणाले, “वाघाला चिता म्हटलं तर तो चिता होत नसतो. वाघ हा वाघच असतो. वाघाने जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा महाराष्ट्रात काय झाले, हे सर्वांनीच पाहिलेलं आहे, असा खोचक टोला केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. पुढे त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही भाष्य केलं. दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं. ती भारतीय संस्कृती आहे. अनेकांना (राष्ट्रवादी, काँग्रेस) हा कमीपणा वाटतो. पण सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना ते (राष्ट्रवादी, काँग्रेस) कसे चालतात?”, असा प्रश्नही दीपक केसरकरांनी केला आहे.
उद्धव ठाकरे कुठेतरी मेळावा घेणारच आहेत. मग तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंचावर निमंत्रित पाहुणे म्हणून बोलवावे. ते येतात की नाही हे समजेल. औरंगाबादचे संभाजीनगर करायचे होते, तेव्हा अनेकजण मंत्रीमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. पुढे औरंगाबादचे संभाजीनगर केले म्हणून त्यांनी खोटी जाहिरात केली. आम्हाला तो ठराव पुन्हा घ्यावा लागला. आतातरी राजकारण थांबवुया आणि विकासाचे काम करुया, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.