मुंबई | Deepak Kesarkar Said The Cause Of Chief Minister’s Illness – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कालचे (4 ऑगस्ट) दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात काय अपडेट्स आहेत?” असं पत्रकारांनी दीपक केसरकर यांना गुरुवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारलं. यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, “मी जेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरु होती. ते आजारी नाहीत. मात्र त्यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली आहे.” मुख्यमंत्र्यांना थकव्यामुळे विश्रांतीचा सल्ल डॉक्टरांनी दिल्याची माहिती समोर आली असून केसरकारांनी या थकव्या मागील कारण हे अपुरी झोप असल्याचं सांगितलं आहे.
“अनेक दिवस ते (मुख्यमंत्री शिंदे) नीट झोपलेले नाहीत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात तेव्हा रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. मग त्या लोकांना न भेटता निघून जाणं त्यांना योग्य वाटत नाही. म्हणून तीन वाजता ते एखाद्या ठिकाणी लोकांना भेटले आणि नंतर झोपायला गेले तरी पाच सहा वाजता झोपायचं मग सहा, सात वाजता उठायचं असं होतं. एक दोन तासांची झोप ही कोणालाही पुरेशी नसते. मात्र मुख्यमंत्री सातत्याने मागील आठ दिवसांपासून हे करत आहेत. ते अजिबात झोपत नाहीत,” असं केसरकर यांनी सांगितलं.