मुंबई : (Deepali Sayyad On Sanjay Raut) एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. बिंधास्तपणे विधान करणाऱ्या राऊतांवरही शिंदे गटाकडून त्याच पद्धतीनं सातत्यानं टीका केली जात आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखांची भुमिका मोठ्यामनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल असं ट्विट करुन दिपाली सय्यद यांनी खळबळ उडवून दिली आहे. या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी सय्यद यांना चांगलंच खडसावलंय. दीपाली सय्यद यांनी काळजीपूर्वक विधानं करावीत, अशा शब्दांत राऊतांनी त्यांना सुनावलं आहे.
त्यानंतर सय्यद म्हणाल्या, मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, आता राऊतांनी संयम बाळगून पुढाकार घेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणावं असं आवाहन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे. दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेतील आमदारांच्या भूमिकेनंतर दोन गट पडले आहेत. शिवसेना एकाच कुटुंबाचे असे दोन गट ही न बघवणारी स्थिती आहे. एकाच आधारवडाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते असणं महत्वाचं आहे. त्यामुळं आता अधिकचा वेळ न जाता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, असं माझं मत आहे. ही माझी एकटीचीच इच्छा नाहीतर, असंख्य शिवसैनिकांच्या मनातलं आपण बोलून दाखवलं असल्याचंही त्या म्हणाल्या.