मुंबई | Deepali Sayyad – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तसंच शिंदे गटानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार असून दीपाली सय्यद (Deepali Sayyad) शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसंच दीपाली सय्यद यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होतं. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिलं. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली,” असं सांगितलं.
पुढे दीपाली सय्यद यांनी तुम्ही सध्या शांत का आहात? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडे तीन वर्षं झाली आहेत. स्क्रीवनर येऊन टिपण्णी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रिय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोकं काम करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात.”
“दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होती. एकत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे. जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवतं. प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकानं आपाल गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल, असं सूचक विधान दीपाली सय्यद यांनी यावेळी केलं. सध्या मी शिवसेनेत आहे असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेसह आहात का? असं विचारण्यात आलं असता मी ‘वेट अँड वाॅच’च्या भूमिकेत असल्याचंही त्या म्हणाल्या.