नवी दिल्ली : (Delhi Floods) राजधामी दिल्लीवर हिमाचल प्रदेश आणि हरियाणीमुळे ओढवलेले परप्रांतीय महापुराचे संकट तूर्तास जैसे थेच असून, आता त्यावरून राजकारण सुरु झाले आहे. काही महत्त्वाच्या रस्त्यांचा अपवाद वगळता जनजीवन संथगतीने पूर्वपदावर येत याहे . सर्व काही ठीक राहिले तर 208.62 मीटर ऐतिहासिक जलस्तर गाठणाऱ्या यमुना नदीची शनिवारी रात्री 206.62 मीटरवर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संघटना युद्धपातळीवर काम करून मदतकार्य सोबतच रस्ते आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात गुंतले आहेत.
शनिवारी सकाळी 11 वाजता यमुनेचा पातळी 207.43 मीटरवर होती. याच वेगाने पाणी ओसरत राहिले आणि हिमचल प्रदेश तसंच हरियाणात पाऊस आला नाही तर रात्री 11 वाजेपर्यंत यमुनेचा जलस्तर 206.72 मीटरवर येईल, असे दिल्लीच्या महसूल सचिवाचे म्हणणे आहे. दिल्लीतील यमुनेची पातळी ओसरत असली तरी महत्त्वाचे अनेक रस्ते अजूनही पाण्याखालीच आहेत. मागील तीन दिवसांत यमुनेच्या काठीवरील 25 हजारांपेक्षा जास्त पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आहे.
दिल्लीसह नोएडातील अनेक भाग पुराच्या तडाख्यात आहेत. गाझियाबाद एनडीआरएफच्या पथकाने नोएडाच्या पूरग्रस्त भागातून तब्बल 1 कोटी रुपयांच्या प्रीतम नावाच्या सांडसह शेकडो गुरांची सुटका केली. भारतातील नंबर 1 सांड प्रीतमची सुखरूप सुटका केली असे एनडीआरएफने ट्विटरवर सांगितलं आहे.