जुन्नर : आज आयुष मंत्रालयाकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यात राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था स्थापन व्हावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ई-मेलद्वारे आयुष मंत्रालयाकडे सादर केला आहे. यामुळे अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील एका ठरावाची सुरवात झाली आहे.
तसंच जुन्नर,आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात म्हणजेच भीमाशंकर अभयारण्यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. आयुर्वेदात या वनौषधींना महत्वाचे स्थान आहे.त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी या वनौषधींचे संशोधन, संवर्धन व लागवड याचबरोबर त्यावर प्रक्रिया करणेसाठी शास्त्रोक्त पद्धतीने काम करणारी राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था असावी अशी संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिला असून पवार यांनी जिल्हा नियोजन निधीतून संस्थेचा डीपीआर तयार करण्यासाठी निधी मंजूर केला आहे.
या राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्थेचा प्रस्ताव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. तसंच डॉ. कोल्हे यांनी ३१ जुलै २०२१ रोजी करमाळकर यांची भेटबी ही घेतली होती. त्यावेळी त्यानी या प्रकल्पाला प्रतिसाद देत एक समिती स्थापन केली होती.