मुंबई : शुक्रवारी रात्री शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपाचे नेते मोहित कंभोज यांच्या गाडीवर ‘मातोश्री’ परिसरात हल्ला केला. यावर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले. खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. यामुळे शिवसेना कार्यकर्ते त्या परिसरात मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कंभोज मातोश्री बंगल्यापुढे गाडीतून उतरले आणि व्हिडीओ शूटिंग करत होते. कंभोज पाहणी करीत असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांना आल्याने ते त्यांच्यावर धावून गेले. यासंर्दभात आता भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे.
यावेळी आशिष शेलार म्हणाले, “भाजपाचा पोलखोलचा कार्यक्रम हा परवानग्या घेऊन चाललेला आहे. अधिकृत परवानग्या घेऊन मैदानांमध्ये, रस्त्यावर हा कार्यक्रम होत आहे. जनतेचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराची मांडणी आम्ही पोलखोलमधून करत आहोत. लोकशाही मार्गाने चाललेल्या या क्रायक्रमावर एखादी व्यक्ती हल्ला करते हे नामर्दपणाचे लक्षण आहे. शिवसेनेने हा दंगेखोरपणा थांबवावा. पोलिसांनी कायद्याचे राज्य आहे याचा परिचय मुंबई आणि महाराष्ट्राला द्यावा.”
“मोहित कंभोज एका गाडीने जात होते. एकट्या व्यक्तीला बघून २५ लोकांनी एकत्र येऊन झुंडबळी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पोलखोलचे कार्यक्रम थांबवणार नाहीत. पण एकटे जाणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर २५ लोक हल्ला करत असतील तर तुम्हीसुद्धा कधीतरी गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा. काळोखात अन्य ठिकाणाहून दगड येऊ शकतात याचे भान त्यांनी ठेवावे. जशास तसे उत्तर देण्यासाठी गेली २७ वर्षे आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीने आणि ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ ,” असा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे.