पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा डेंग्यू या आजाराने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १७ दिवसांत डेंग्यूंचे ६६ रुग्ण आढळल्याची आकडेवारी पालिकेकडे आली आहे. पालिकेकडे न आलेल्या आकड्यांची संख्या याहून अधिक असू शकते. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर फेब्रुवारी ते मे अशा चार महिन्यांमध्ये डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले. मात्र, डेंग्यूची लागण झालेल्या एकाही रुग्णांची नोंद झाली नाही. जून महिन्यापासून पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जूनमध्ये केवळ १७ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. जुलै महिन्यात हा आकडा दुपटीने वाढला. डेंग्यू रुग्णांची संख्या ३७ वर जाऊन पोहोचली. तर ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३६ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे ही संख्या नियंत्रणात होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात तिपटीने रुग्णसंख्येत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये तब्बल ९८ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याने प्लेटलेट्सचीही मागणी वाढू लागली आहे.
पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होत असते. त्यामुळे घराजवळील परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. घराच्या छतावरील किंवा फ्लॅटच्या तळघरात असलेली पाण्याची टाकी झाकण लावून बंद ठेवावी. फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रीजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्याला रिकामे करावे. घराच्या मागच्या अंगणातील किंवा गच्चीवरील भंगारमालाची विल्हेवाट लावावी.
डेंग्यूची लक्षणे, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी,उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे आदी.