हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे काल निकाल लागले. या निकालानंतर देशातील राजकारण बदलत चालल्याचे दिसत आहे. कारण हरियाणात भाजपाचा पराभव होईल असे एग्झिट पोल्सचे अंदाज होते. परंतु, या सर्व अंदाजांना बाजूला सारून हरियाणात भाजपने विजयी गुलाल उधळला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनीही “सकाळच्या भोंग्याला आता कसं वाटतंय” असा खोचक सवाल करत संजय राऊत आणि महाविकास आघडीवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.
हम तुम्हारे हैं कौन ? अशी महाविकासची अवस्था
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “हरियाणाचे निकाल लागल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे सांगतो. काँग्रेस, शरद पवार यांचा गट आणि उबाठा सेना हे त्यांची शस्त्र चमकवून बसले होते. हरियाणात भाजपा हरली की आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो. पण ती संधी त्यांना मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे तो त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्र आहोत म्हणणारे, हम साथ साथ है! म्हणणारे हम तुम्हारे हैं कौन असं विचारु लागले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना पाहण्यास मिळतं आहे. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की या निवडणुकीने फेक नरेटिव्ह तोडून दाखवला. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. फेक नरेटिव्ह लोकांच्या लक्षात आला आणि लोक भाजपाच्या पाठिशी आहेत.” असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी,”मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की मी ज्यावेळी अर्थमंत्री होतो त्यावेळी आठ नवी मेडिकल कॉलेज आम्ही घोषणा केली होती. त्यातले पाच कॉलेजेस विदर्भातले आहेत. त्यातल्या पाच कॉलेजेसची सुरुवात होते आहे. यामुळे मेडिकल इंटेकमध्ये वाढ होणार आहे. याचा फायदा मेडिकल करु पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच नागपूरचं विमानतळ हे अत्याधुनिक होतं आहे. त्याचा मला आनंद आहे. शिर्डीतही विमानतळ मोठं करण्याचा आमचा मानस होता त्यामुळे ते देखील आम्ही तयार करत आहोत. असे म्हटले आहे.
जागावाटपाचा ८० टक्के पेपर सोडवला
दरम्यान , आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असणारी जागावाटपाची चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आहे. आमचा ८० टक्के पेपर सोडवून झाला आहे, उरलेला २० टक्के पेपर सोडवला की आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ. मी मुख्यमंत्री असताना घोषणा केली होती की ओबीसींसाठी ३६ हॉस्टेल तयार करु. आमच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी ७२ हॉस्टेल बांधू अशी घोषणा केली होती. पण एकाचंही काम सुरु केलं नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता याचं काम सुरु झालं आहे, आम्ही ५२ हॉस्टेलचं उद्घाटन करतो आहोत. ज्या ठिकाणी हॉस्टेल नाही त्यासाठी रहिवासी आणि खाण्यापिण्यासाठी भत्ता देत आहोत.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.