“ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्षच घेऊन आलो”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अहमदनगर | Devendra Fadnavis – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्षच आम्ही घेऊन आलो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ते आज (17 ऑगस्ट) शिर्डीजवळच्या काकडी गावात आयोजीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचं सरकार हे फेसबुक सरकार नव्हे तर फेस टु फेस असं सरकार आहे. मी म्हणालो होतो की मी पुन्हा येईल आणि त्याची दहशत अजूनही आहे. 2019 साली लोकांनी केलेल्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. पण आमच्याशी ज्यांनी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्षच आम्ही घेऊन आलो.

तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून वॉर सुरू असल्याचं दिसतंय. यावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची जी खुर्ची आहे तिच्या संरक्षणासाठी आमची नजर तिच्यावर आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू नये म्हणून आमचं लक्ष त्या खुर्चीकडे आहे.

Sumitra nalawade: