देवेंद्र फडणवीसांनी इंधन दरकपातीवरून राज्य सरकारवर केली गंभीर टीका, म्हणाले…

मुंबई : केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी दरात कपात केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारनेदेखील इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली़ आहे. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंधन करकपात म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचं म्हणत पेट्रोल, डिझेलचे भाव केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कमी झाले आहेत, असं म्हटलं आहे.

“महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi) राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली आहे. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही. तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटलं होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला. महाराष्ट्रात पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये जे कमी झाले. ते रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचेसुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.” अशी टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.

तसंच “इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रिकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो,” असंही फडणवीस यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

Dnyaneshwar: