देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना गुरूकिल्ली; म्हणाले, “जसं ते 10-12 कारखाने सांभाळतात तसं…”

मुंबई | Devendra Fadnavis On Ajit Pawar – सध्या राज्यात पालकमंत्री पदावरून भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे एकाचवेळी सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यावर टीका केली होती. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“आम्हाला एकाच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळताना नाकी नऊ यायचं. हे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कसं सांभाळणार आहेत”, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी गुरूमंत्र देण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. “जिल्हे कसे मॅनेज करायचे त्याचा गुरूमंत्र मी अजित पवारांना नक्कीच देईन”, अशा शब्दांत फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावला होता. त्यावर अजित पवारांनी प्रतिटोला लगावला आहे. “मी आता त्यांना पत्र पाठविणार आहे की ट्रेनिंगसाठी केव्हा येऊ? त्या ट्रेनिंगकरता काही फी लागणार आहे का ? की ते मोफत दिलं जाणार आहे? त्याबाबत मी त्यांच्याशी हितगुज करतो. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली होती.

अजित पवारंनी केलेल्या या मिश्किल टिप्पणीवर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आपण हे ट्रेनिंग सेशन ऑनलाईन करू त्यामुळे त्यांना तसदी घ्यावी लागणार नाही. तसंच मी त्यांना गुरूकिल्ली एवढीच सांगेन की, ज्याप्रकारे ते 10 ते 12 कारखाने सांभाळतात, त्याप्रमाणे पाच-सहा जिल्हे सांभाळणं कठीण नाही”, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लगावला आहे

Sumitra nalawade: