नागपूर : (Devendra Fadnavis On Jayant Patil) तोलून मोजून बोलणारे, आपल्या शब्दांनी समोरच्यावर बोचरे घाव घालणारे नेते म्हणजे जयंत पाटील.. पण नागपूर अधिवेशनात जयंतरावांच्या संतापाचा पार चढला अन् विरोधकांना बोलू न देणाऱ्या अध्यक्षांना असंविधानिक शब्द वापरला म्हणून त्यांचं निलंबन करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. खरं तर जयंतरावांना हा फार मोठा धक्का होता.
कारण ३० वर्षाच्या राजकीय जीवनात निलंबन वगैरे असे प्रकार त्यांनी कधीच पाहिले नव्हते. मात्र सतत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंतरावांचाच शिंदे फडणवीसांनी कार्यक्रम केल्याची चर्चा झाली. यातून जयंत पाटील सावरत नाहीत तोच आता पुन्हा जयंतरावांना दुसरा दणका देण्याची तयारी फडणवीसांनी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहेत.
सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने याच प्रकरणावरून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनंतर शिंदे फडणवीस सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मानसिंग नाईक यांना बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली होती.
तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा जयंत पाटील यांची बँकेवर सत्ता आली. यावेळी मानसिंग नाईक यांना बँकेचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र आता याच बँकेत गैरव्यवहाराच्या आरोपांवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.