उस्मानाबाद : (Devendra Fadnavis On kailas patil) परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना मदत केली जात नाही. दरम्यान, पिक विमासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळी कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी काही दिवस उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे.
पीक वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला 1200 कोटी रुपये येणे असून, या प्रमुख मागणीसाठी कैलास पाटील यांचे उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला होता. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही विषय होते ते सर्व मार्गी लागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आमदार कैलास पाटील उपोषण मागे घेत असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली.