मुंबई : (Devendra Fadnavis On Sharad Pawar) राज्यात कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं आहे. कंत्राटी भरतीविरोधात महाविकास आघाडीनं आंदोलनही करायला सुरुवात केली आहे. यावर सरकारने नमती भुमिका घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केलं. मात्र, यावेळी त्यांनी काही जुने दाखले देत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिकास्त्र डागलं आहे. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील लक्ष केलं आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्या पापाचं ओझे आपल्या सरकारने का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पाप त्यांनी करायचं आणि आमच्या माथ्यावर फोडून त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य करायचं नाही.
कंत्राटी भरतीवरून शरद पवारांनी देखील राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार असं आधी करत नव्हते पण, अलिकडच्या काळात पक्ष फुटल्यापासून शरद पवार देखील असं करायला लागलेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.