पहाटेच्या शपथविधीवर पवार-फडणवीसांमध्ये घमासान सुरुचं! उपमुख्यमंत्री म्हणाले; “मी बोललो की…”

पुणे : (Devendra Fadnavis On Sharad Pawar) मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीची नव्याने चर्चा होत आहे. हा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस असत्य बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली, असे नवे विधान शरद पवार यांनी केले आहे. पवारांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगवळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावरच फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

“हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोललो तेच कसं खरं होतं, हे तुम्हाला हळूहळू समजत आहे. मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे,” असे विधान देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल,” असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.

२३ नोव्हेंबर २०१९ ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं, त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता.

Prakash Harale: