मुंबई | Devendra Fadnavis – सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणानं (Shraddha Walkar Case) देशात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावालानं तिची हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केले. कोणाला संशय येऊ नये म्हणून आफताबनं ते तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तसंच ठराविक दिवसांनी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगल्यामध्ये फेकायचा. तब्बल सहा महिन्यांनंतर हे दृष्कृत्य आता उघडकीस आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली असून या प्रकरणावर तपास सुरू आहे. त्यात आता श्रद्धाचं एक पत्र समोर आलं आहे. या पत्रात तिनं केलेल्या उल्लेखाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
दोन वर्षांपूर्वी अर्थात 2020 साली श्रद्धानं नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यात आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. तिनं पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं. “आफताबनं मला अनेकदा मारहाण केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे. आज त्यानं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला भीती वाटतेय की तो मला जीवे मारून माझे तुकडे करेल आणि मला फेकून देईल. मला जर काही झालं तर त्यासाठी आफताब कारणीभूत असेल”, असं श्रद्धानं त्या पत्रामध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, श्रद्धाच्या या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. “ते पत्र माझ्याकडेही आलं आहे. मी ते पाहिलं आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई झाली नाही तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल. जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
View Comments (0)