मुंबई | Devendra Fadnavis Reaction On Rutuja Latke Resignation – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांवर शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नियम सर्वांसाठी सारखे आहेत. कोणताही दबाव आणला जात नाही. आमचा कोणावरही दबाव नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय चर्चेतून घेतला जाणार आसल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
महापालिका पूर्णपणे स्वायत्त आहे. राजीनामा घेण्याबाबत त्यांचे निर्णय आहेत. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही. त्यात आमचा हस्तक्षेप नाही. आमच्याकडूनही कोण निवडणूक लढणार याची घोषणा आम्ही लवकरच करू, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, ऋतुजा लटके यांनी आज (12 ऑक्टोबर) महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना महापालिका आयुक्तांनी माहिती दिली. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर नेमका काय निर्णय घ्यायचा याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल, असं इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे.