भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
‘या’ मान्यवरांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती
महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती मुंबईतील आझाद मैदानावर आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेतली. २०१४ ते २०१९ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. २०१९ ला त्यांनी अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी ते मुख्यमंत्री बनले होते, तेव्हा त्यांना ७२ तासात राजीनामा द्यावा लागला होता. मविआ सरकारच्या काळात ते विरोधी पक्षनेते देखील होते. एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. आता महायुती सरकारचे ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आझाद मैदानात दाखल झाले होते.