तुळजापूर | Tuljapur News – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी आहे. आता तुळजाभवानी मंदिरात जाताना भाविकांना काही कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे. जे लोक वेस्टर्न कपडे परिधान करून येतील त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबतचा एक फलकही मंदिरात लावण्यात आला आहे.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात असभ्य आणि तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. तसंच मंदिरामध्ये भाविकांसाठी मंदिर संस्थांच्या वतीनं एक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीचं एक फलक मंदिरात लावण्यात आलं आहे. या फलकावर लिहिलं आहे की, अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसंच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा.
दरम्यान, तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात आता महिलांना वेस्टर्न कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसंच केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीत. मंदिरानं भाविकांना ड्रेसकोडबाबत कडक नियम घालून दिले आहेत.