पुणे : गर्ल ऑन ‘विंगचेअर’ ‘मोटिवेशनल स्पीकर’ म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील दीक्षा दिंडे हिला नुकतीच ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे. भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरातील ज्या ७५ मुलांची या स्कॉलरशिपसाठी निवड झाली. ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी ही अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे.
ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते. यंदाच्या वर्षी १६० देशांमधून ६८ हजार मुलांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यात दीड हजार मुलांची निवड केली जाते. त्यातील दीक्षा दिंडे यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रज येथील सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी दीक्षा जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. तिला ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानादेखील तिची जिद्द, हुशारी, तसेच तिच्या स्वप्नाला कोणी रोखू शकले नाही.
अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या दीक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटिवेशनल स्पीकर’ म्हणून बोलावले जाते. व्हील चेअरशिवाय फिरता न येणारी दीक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी तसेच तिच्या सामाजिक कामामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. पुण्यातील वस्तीतील मुलांचे शिक्षण, अपंग मुलांच्या समस्या, मासिक पाळी या सगळ्या विषयांवर काम करणार्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली.
त्यानंतर २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची ‘ग्लोबल यूथ अँबेसडर’ म्हणून तिची निवड झाली. तसेच ‘शाश्वत विकास,’ ‘तरुणांचे नेतृत्व,’ ‘दिव्यांगांचे अधिकार’ या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, साऊथ कोरिया, इजिप्तमध्ये जाऊन आली आहे. अपंगत्वामुळे तिला अनेक ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागला.