मुंबई : राणा दांपत्याच्या प्रकणावरून काल राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाल्याचं पहायला मिळालं. राणा दांपत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेणं अन् त्यानंतर किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेल्याा दगडफेकीच्या घटनेनंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आता समोरासमोर येऊन उभे ठाकले आहेत. अशातच कालच्या गदारोळ प्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याांनी प्रतिक्रीया दिली आहे.
वळसे पाटील राणा दांपत्यांना चिमटा काढताना म्हणाले की, ‘पोलिसांकडून योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जातेय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मात्र पोलीस सक्षमपणे ही परिस्थिती काबूत ठेवतील.
तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको हा विरोधकांचा प्रयत्न आहे. राणा दाम्पत्याच्या कृती मागे नक्कीच कुणाचा तरी हात आहे, नाहीतर ते असं धाडस करू शकत नाही, असा आरोपही पाटील यांनी यावेळेस लगावला आहे.
दरम्यान किरीट सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नव्हती. तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवण्याचं काम त्यांनी करायला नको होतं. मात्र जे झालं ते योग्य नाही, असंही वळसे पाटील यावेळेस बोलताना म्हणाले.