पादचार्यांची सोय म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले. पण सध्या या मार्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कोथरूड वनाज येथील आप्पासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग येथे अस्वच्छतेचे साम्राज्य झाल्याचे दिसत आहे.
पुणे dirtiness : बहुतांश ठिकाणी कचरा, साठलेले पाणी यामुळे भुयारी मार्गात दुर्गंधी निर्माण झाल्याने नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. पुणे महापालिकेने (PMC) शहरात २० भुयारी मार्ग आहेत. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांत भुयारी मार्गांची संख्या वाढली आहे. भुयारी मार्गांची स्थिती प्रचंड दयनीय झाली आहे. यामध्ये प्रचंड अस्वच्छता आहे, तसेच गुटखा खावून भिंती रंगल्याचे सध्या दिसत आहे. तरी या पिचकारी बहाद्दरांवर पालिकेने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महापालिकेने बांधलेले भुयारी मार्ग व उड्डाणपूल पादचार्यांच्या नाही तर वाहनांच्या सोईच्या दृष्टीने बांधले गेल्याने त्यांचा जास्त वापर होत नाही. तसेच जिने चढणे व उतरण्यास नागरिकांकडून कंटाळा केला जातो.
शहराच्या इतर भागांत गेल्या काही वर्षांत पादचार्यांचा विचार न करता तत्कालीन नगरसेवकांच्या आग्रहास्तव काही ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात आले. पण त्यांचीही अवस्था दयनीय आहे. कर्वेनगर येथे उड्डाणपूल प्रस्तावित असतानाही भुयारी मार्ग बांधण्यात आला, त्यामुळे त्याचा वापर होत नाही. त्याच पद्धतीने कोथरूड येथील वनाज येथील आप्पासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग, हडपसर येथील मंत्री मार्केट येथील भुयारी मार्ग, चंदननगर, हडपसर वैदूवाडी येथील भुयारी मार्गांची स्थिती प्रचंड दयनीय आहे. फुटलेल्या फरशा, चोरीला गेलेले सीसीटीव्ही, साचलेले घाण पाणी व कचरा यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.