मुंबई | Disclosure Of Shahaji Bapu Patil – आमदार शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्या भाषेत उद्धव ठाकरे यांच्या भोवताली असणाऱ्या काही नेत्यांवर ‘चांडाळ चौकडी’ म्हणत अतिशय शेलक्या भाषेत टोलेबाजी केली. शिवसेनेच्या चुकीच्या धोरणामुळे आणि चांडाळ चौकडी वैतागून दोन दिवसात 50 आमदार उठावासाठी एकत्र आले ही जागतिक घटना आहे. आमच्यातील कोणीही गद्दार नसून आईच्या कुशीतूनच आम्ही खुद्दार मराठमोळी माणसे आहोत, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जवळ असलेली चांडाळ चौकडी एका बाजूला आणि संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला. असं चित्र असताना ठाकरे यांनी या कुजक्या चौकडीला दूर ठेऊन शांतपणे विचार केल्यास त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे मत समजून येईल. काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच सत्ता बदल होईल अशा वावड्या उठवणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात ठेवावे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 50 आमदारांपैकी एकही आमदार आयुष्यात कधीही पुन्हा त्यांच्या हाताला लागणार नाही असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. तसंच मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते पण आमच्या आग्रहामुळे त्यांनी हे पाऊल उचललं, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मुंबई येथून आमदारांनी बाहेर पडायचे ठरवले तेव्हा शरद पवार, दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा हे सर्व मुंबईत असताना एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या कानाला खबर न लागू देता हे मिशन यशस्वीपणे राबवले. अगदी सगळ्यांना चारीमुंड्या चित करायची ताकद असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आम्ही जेम्स बॉण्ड म्हणतो. मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते पण आमच्या आग्रहामुळं त्यांनी हे पाऊल उचललं. शिंदे यांच्यासोबत असणारे सर्व आमदार मजबूत आणि विचार करणारे असल्याने यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यातील एकही आमदार आयुष्यात त्यांच्या हाताला लागणार नाही. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो असून यातही भाजप शिवसेनाच भगवा फडकविणार, असं देखील शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.