मुंबई | Arjun Khotkar – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं होतं. त्यानंतर 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. तसंच शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता कट्टर शिवसैनिक अर्जुन खोतकर हे देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काल (सोमवार) अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा आज सकाळी दानवे आणि खोतकर यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसंच अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची देखील सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
अर्जुन खोतकर यांनी 2019 मध्ये एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. त्याची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली होती. रावसाहेब दानवे आणि मी गेल्या 30 वर्षाचे जोडीदार आहोत. रावसाहेब दानवे हे माझी मेहबुबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात असे वक्तव्य खोतकरांनी केलं होतं.
दरम्यान, जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खोतकर यांनी जालना लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला होता. जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, त्यानंतर पक्षाचा आदेश मान्य करत त्यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली होती.