भोसरी, पिंपरीत दोन कचरा स्थानांतर केंद्रे उभारणार
९ कोटी ४४ लाख रुपये खर्च येणार
नागरिकांचे आरोग्य होणार सुरक्षित
सध्या घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात
पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचर्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन होण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर चार ठिकाणी ट्रान्स्फर स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक आणि पिंपरीनगर स्मशानभूमीजवळील पंपिंग स्टेशन या ठिकाणी कचरा स्थानांतर केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
पिंपरी : शहरातील ओला व सुका कचरा एकाच ठिकाणी गोळा करून वर्गीकरणानुसार मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. या कामासाठी ९ कोटी ४४ लाख रुपये खर्च होणार आहे. उद्योगनगरीत दररोज निर्माण होणार्या घनकचर्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे ८१ एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रांतून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे २५ ते ३० ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्रे कार्यान्वित आहेत.
हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील बर्याच भागांतून गोळा करीत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हवेचे प्रदूषणही होते. लिचेटची गळती रस्त्यावरून होते. दुर्गंधीचा त्रासही होतो. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. हे टाळण्यासाठी महापालिकेने इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्स्फर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्तांच्या १७ सप्टेंबर २०२१ रोजीच्या मान्य प्रस्तावानुसार कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, थेरगाव येथील एम. एम. शाळेजवळील स्मशानभूमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर २३ – निगडीतील गायरान जागा, भोसरी-नेहरूनगर एमआयडीसी जे ब्लॉकमधील मोकळी जागा या ठिकाणी ट्रान्स्फर स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने या कामासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. व्यतिरिक्त क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक येथील कचरा स्थानांतर केंद्र व इंडस्ट्रियल रिकव्हरी फॅसिलिटी, तसेच पिंपरीनगर स्मशानभूमीजवळील पंपिंग स्टेशन या ठिकाणी कचरा स्थानांतर केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी मेकॅनाइज्ड वेस्ट ट्रान्स्फर यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी १० डिसेंबर २०२१ रोजीच्या पत्राद्वारे निविदा कार्यवाही कळविण्याबाबत कळविले आहे.
हे ट्रान्स्फर स्टेशन उभारल्यामुळे त्या-त्या भागातील ओला व सुका कचरा एकाच ठिकाणी गोळा करून वर्गीकरणानुसार ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करून हूक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल. इंधन बचत, हवेचे प्रदूषण कमी, लिचेटची गळती बंद होणे या बाबी शक्य होणार आहेत. त्यानुसार अशा कामाचा अनुभव असणारे प्रकल्प सल्लागार टंडन अर्बन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कामांतर्गत आवश्यक मेकॅनिकल उपकरणे व विद्युतविषयक बाबींचे अंदाजपत्रक २०१८-१९ ची दरसूची आणि महापालिकेचे मंजूर दरपृथक्करणानुसार बनविण्यात आले. दोन ट्रान्स्फर स्टेशनसाठी भांडवली खर्च, जीएसटी व इतर शुल्क वगळून सुमारे ९ कोटी ४४ लाख ३९ हजार रुपये इतका येत आहे. या कामाचे चालन, देखभाल व दुरुस्तीचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.