आता धाडस नको

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली असली तरी कालचे हे पोर फारच तिखट निघाले आणि त्या मानाने ज्यांच्या खांद्यावर राज्याची भिस्त ठेवली ते गूळमाट निघाले, अशी भावना त्यांची नक्कीच झाली असेल. ते स्पष्ट बोलणार नाहीत, मात्र यापुढच्या निवडणुका आणि राजकीय डावपेचांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत सावधपणे काम करावे लागणार आहे हे नक्की.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस झाले आहेत. हे वाक्य वरवर पाहता अत्यंत साधे आहे. किंबहुना सगळ्यांना माहीत आहे असे आहे. मात्र २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि १० ते २० जून यामध्ये केवळ दहा दिवसांचे अंतर आहे. त्यातील दोन दिवस संपलेले आहेत आणि हातात सात दिवस उरले आहेत. या सगळ्याचा विचार करता महाविकास आघाडीला ज्या नियोजनाच्या अभावामुळे पराभव पत्करावा लागला त्याची पुनरावृत्ती पुन्हा व्हायची नसेल तर आगामी सात दिवसांमध्ये बिनचूक नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत यांनी आपल्या हट्टीपणामुळे केवळ राज्यसभेची एक जागा घालवली नाही तर शिवसेनेची अब्रूही घालवली आहे.

निवडून येण्यासारखा उमेदवार त्यांना निवडून आणता आला नाही, हा एक भाग. त्यातूनही झुकेगा नही म्हणत जो विनाकारण ताठरपणा दाखवला त्यामुळे आत्मघाताशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी भुजबळ, देसाई यांचे शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी फडणवीस यांनी राज्यसभेची ही जागा आम्हाला द्या. विधान परिषदेची जागा आम्ही तुम्हाला देऊ, असा एक फॉर्म्युला त्यांच्यापुढे ठेवला होता. मात्र फाजील आत्मविश्वासामुळे निवडणूक स्वतःहून स्वतःवर लादलेल्या शिवसेनेने अब्रूसह राज्यसभेची जागा तर घालवलीच, पण त्याचबरोबर आगामी विधान परिषदेच्या जागेचे तणावपूर्ण आव्हानही स्वीकारले आहे. विधान परिषदेचे आव्हान त्यांना पेलता आले नाही तर शिवसेनेची उरलीसुरली अब्रू धुळीला मिळणार आहे. पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागेवर काँग्रेसने हात साफ केला.

राज्यसभेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने हात साफ केला. राज्यसभेत गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने आपले संख्याबळ वाढवले. दुसरीकडे मंत्रिमंडळात राष्ट्रवादीने महत्त्वाच्या आणि जास्त खात्यांचा ताबा घेत आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या तालावर नाचवत राज्यालाही हातात ठेवले आहे. याउलट काँग्रेस पक्षाने कोणताही गाजावाजा न करता सत्तेमध्ये स्थान मिळवून राज्यसभेच्या एका जागेवर परप्रांतातला; परंतु गांधी घराण्याच्या मर्जीतला उमेदवार निवडून आणून आपली प्रतिष्ठा कायम ठेवली. विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या चार पक्षांत सगळ्यात कमी जागा मिळवल्यावरही सत्तेत स्थान मिळवले. या धोरणीपणाला हुशारी असे म्हणतात. त्यातून राज्यासंदर्भातला कोणताही निर्णय घेत असताना निर्णय आपल्याप्रमाणे असतील तर ते राज्यांनी घेतले आणि राज्यातल्या नेत्यांना ते नको असतील तर श्रेष्ठींनी दिलेल्या मार्गदर्शनावर वाटचाल करीत असल्याचा मध्यम मार्ग स्वीकारून राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी खुर्ची आणि आब दोन्हीही सांभाळलं.

यात शिवसेनेला वाचाळपणा करण्यापलीकडे कोणतीही भूमिका मिळाली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपतील कोणी टीका केली तर संजय राऊत सर्वप्रथम त्याला प्रत्युत्तर देत होते. काँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या टीकेला राऊत परतवून लावत होते. मात्र शिवसेनेला ज्या ज्या वेळी अडचणीत आणले गेले त्यावेळी भाजपविरोधात या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला नाही. यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेता आली नाही. मोठ्या नुकसानीला शिवसेनेला सामोरे जावे लागत आहे आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख म्हणून या सगळ्या प्रश्नांवर आणि परिस्थितीवर काही करता येत नाही, हे दुर्दैव आहे. एका अर्थी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सुखात आहेत. इतिहासात जास्तीत जास्त त्यांच्यावर अपयशी मुख्यमंत्री म्हणून शिक्का लागेल आणि कालांतराने तोही निघून जाईल.

त्यामुळे कोणाला जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भात देणेघेणे आहे आणि आपण निवडून जातो ते जनतेच्या या समस्या सोडवण्यासाठी यावर ही मंडळी विचार करीत असतील असे सध्या तरी वाटत नाही. राजस्थान येथे अशोक गहलोत यांनी काँग्रेसची सरशी करीत अत्यंत हुशारीने राज्यसभेची खेळी खेळली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे साधता आले नाही, हेही मान्य करावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली ते पाहता ते शरद पवारांच्या बेड बुकमधल्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेले असतील. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली असली तरी कालचे हे पोर फारच तिखट निघाले आणि त्या मानाने ज्यांच्या खांद्यावर राज्याची भिस्त ठेवली ते गूळमाट निघाले अशी भावना त्यांची नक्कीच झाली असेल. ते स्पष्ट बोलणार नाहीत, मात्र यापुढच्या निवडणुका आणि राजकीय डावपेचांत देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत सावधपणे काम करावे लागणार आहे हे नक्की. पवारांच्या शब्दात सांगायचे तर, ‘धाडस नको.’

Nilam: