ठेके नको, कर्मचाऱ्यांना काम लावा !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आज लाडू प्रसाद ठेक्याचा पुर्नविचार करून तो ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता नव्याने ठेका काढला जाईल किंवा मंदिर समितीच्या मार्फत या लाडूच्या निर्मितीचे काम हाती घेतले जाईल असे दिसते. परंतु मंदिर समितीकडे खूप मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी आणि हंगामी मनुष्यबळ आहे, त्याचा अद्यापही पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. या निमित्ताने त्याचा वापर करून ही प्रसाद निर्मिती करण्याची आवश्यकता आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी मंजूर व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. तीन वर्षांपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी आकृतीबंध तयार करून तो शासनाकडून मंजूर करून घेतला आणि अनेकांना हक्काचा रोजगार मिळाला. परंतु जेव्हापासून हा हक्काचा रोजगार मिळाला आहे तेव्हापासून एक प्रकारची उदासिनता कर्मचाऱ्यांमध्ये आलेले दिसते. तेवढे कायमस्वरूपी कर्मचारी नव्हे तर सदस्यांच्या वशिल्याने लागलेले हंगामी कर्मचारी देखील अत्यंत कामचुकार आणि आळशी बनलेले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना आजही काम नाही.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसारख्या एका धार्मिक संस्थेच्या पदाचा दुरुपयोग करून काही सदस्यांनी आपल्या जवळच्या लोकांना अन्न-पाण्याला लावायचे म्हणून या संस्थेवरती नाहक भार बसविला आहे. देवालाही न घाबरणारी राक्षसी वृत्तीचे काही सदस्य हे तेथील पैशाचा आपण अपहार करीत आहोत याचेही भान ठेवत नाहीत. किमान या सदस्यांना थोडी जरी चाड असेल तर त्यांनी या कर्मचाऱ्यांना किमान आता कामाला तरी लावावे. तेव्हा यात्रा कालावधीमध्ये इतक्या मोठ्या कर्मचाऱ्यांचा उपयोग होतो. ऐनवेळी मात्र अनेक कर्मचारी हे केवळ मंदिर परिसरामध्ये फिरत असताना दिसून येतात.

लाडू निर्मितीचा ठेका बाहेर देण्यापेक्षा तो मंदिर समितीच्याच काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन बनविण्यात आला तर मंदिर समितीचे लाखो रुपये वाचतील. काही कर्मचारी आणि महिला कर्मचारी या पाककला शास्त्रामध्ये निपूण आहेत. जे नसतील त्यांना काही प्रशिक्षण देऊन बुंदी बनवायची आणि लाडू वळण्याचे जर काम दिले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे मनुष्यबळ वापरता येऊ शकते. लाडू पुरवठ्याबाबत गेल्या सहा वर्षांपासून प्रचंड अनागोंदी माजलेली आहे. काही सदस्यांनी या लाडू ठेकेदाराशी अंतर्गत संगनमत करण्याचा प्रयत्न केला तर ज्यांचे संगनमत झाले नाही त्यांनी त्यातून संघर्ष केला. यापुढे परत चूक झालेले मंदिर समिती सदस्यातील अधटराव हे देखील याच प्रकरणामध्ये गुंतलेले होते. आजही काही सदस्य आपल्या पक्षाच्या वरिष्ठांच्या जवळीचे दाखले देत अनेक ठेकेदारांना नाहक त्रास देत असतात.

अतुल भोसले आणि सचिन ढोले यांच्या कार्यकाळात बंद पडलेले हे सर्व खाबुगिरीचे उद्योग पुन्हा सुरू झाले. दुर्दैवाने मंदिर समितीचे उपाध्यक्ष असलेले ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर हे एक केवळ बोलती आणि ढोलकी बाहुली म्हणून तेथे कार्यरत आहेत. त्यांना प्रशासकीय वचक अजिबात नाही. जो समोरचा असेल आणि जशी परिस्थिती असेल तसे बोलायचे, कुठलीही ठाम भूमिका घ्यायची नाही हा त्यांचा स्वभाव आहे. मुळातच महाराज पिंड असल्यामुळे बोलून समोरच्याला खुश करून वेळ मारून नेण्यात त्यांचा हातखंड आहे, परंतु यामुळे आपण एका आर्थिक संस्थेचे, एका धार्मिक संस्थेचे नुकसान करीत आहोत आणि ज्या गादीचा ते वारसा सांगत आहेत त्या गादीवरून पांडुरंगाची खूप मोठी सेवेची परंपरा आहे, दुर्दैवाने याचे भान त्यांनी विसरले आणि धर्म कार्यापेक्षाही राजकीय खुर्ची त्यांना अधिक मानाची आणि प्रतीक्षेची वाटू लागली.

कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी किंवा मंदिर समितीसाठी व्यवस्थापक हे देखील फारसे प्रामाणिक राहिले नाहीत. ठेकेदारांच्या हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यापासून ते त्यांच्याकडून लाखो रुपयांचे उपहार, भेटवस्तू देण्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा मंदिर समितीत बोकाळला आहे. पदस्पर्श दर्शनासाठी घेण्यात येत असलेले पैसे आणि पदस्पर्श दर्शनाचा काळाबाजार हा तर वेगळाच विषय आहे. किमान गरीब भाविक-भक्तांच्या पैशावर पोसत असलेल्या कर्मचाऱ्यांना तरी आता काम लावा. लाडू प्रसादासारखे, फोटो फ्रेम बनविण्यासारखी कामे मंदिर समिती कर्मचाऱ्यांकडून करून घ्या. त्यांच्या उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करा आणि कुठेतरी त्या निमित्ताने आपले पापक्षालन करण्याचा देखील मार्ग मोकळा करा, हीच मंदिर समिती सहअध्यक्ष आणि सदस्यांना विनंती.

Dnyaneshwar: