राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याचा विरोध करू नका

मुंबई : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याचा विरोध करू नये, असे म्हटले आहे. रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकतो, भगवान रामचंद्रांच्या चरणी येणार्‍या कुण्याही व्यक्तीचा विरोध केला जाऊ नये. उत्तर प्रदेशमधील खासदार राज ठाकरेंचा विरोध का करत आहेत, याबाबत कल्पना नाही. मी बृजभूषण यांच्याशी चर्चा करणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी यावेळी म्हटले की, राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकारकडे अपेक्षा ठेवू नये. राज्य सरकारविरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढले पाहिजे, असे ते म्हणाले. राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असे वाटले नव्हते. ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना १२ दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणे पूर्ण चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. याबाबत बोलताना काल प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते की, रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकतो, त्यामुळे टोकाची भूमिका घेऊ नये.

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने घेतलेली भूमिका सध्या राज्यात चांगलाच वादाचा विषय ठरला आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड केली आहे. या सगळ्या गोंधळातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमक्या देणारे पत्रही आपल्याकडे आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. या प्रकरणात नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. हे पत्र कोणाकडून आलेय, याबद्दल माहिती नाही. नांदगावकरला धमकी दिली तर ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य, केंद्र सरकारनेही घ्यावी, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करताना देशाचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी केंद्र सरकारपेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष दिले तर चांगले होईल. महिला, बेरोजगार, बारा बलुतेदारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पवारांनी राज्य सरकारला सल्ला द्यावा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करते आहे. चांगल्या कामामुळे नागरिक मोदींवर खूश असून चांगल्या कामाबद्दल विश्वास दाखविला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ला द्यावा, त्या सल्ल्याची गरज त्यांनाच अधिक आहे.

Nilam: