‘चित्रपटात लहान कपडे घालणार नाही’; साई पल्लवीचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दाक्षिणात्य कलाकार सातत्याने चर्चेत येत आहेत. यात काही अभिनेत्यांसह रश्मिका मंदाना, समंथा रुथ प्रभू आणि साई पल्लवी या अभिनेत्रींचीही चर्चा रंगत आहे. सध्या लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी तिच्या ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

विशेष म्हणजे अनेक अभिनेत्री त्यांच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असतात. मात्र, साई पल्लवी एकमेव अशी अभिनेत्री आहे जी तिच्या साधेपणामुळे चर्चेत येत असते. अलीकडेच तिने एका मुलाखतीत लहान कपडे परिधान न करण्याविषयी भाष्य केलं आहे.
कोट्यवधी रुपयांची सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारणारी साई पल्लवी कायम तिच्या साधेपणा आणि नम्रतेमुळे चर्चेत असते, परंतु यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. अनेक अभिनेत्री चर्चेत राहण्यासाठी कायम बोल्ड फोटोशूट वा तोकडे कपडे परिधान करून नेटकर्‍यांचं लक्ष वेधत असतात. मात्र, साई पल्लवी कायम साध्या वेशात, ड्रेस किंवा साडीमध्ये तिचे फोटो शेअर करीत असते. त्यामुळे ती शॉर्ट ड्रेस का घालत नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर तिने त्यामागचं कारण सांगितलं आहे.

मी एका मध्यमवर्गीय साध्या कुटुंबातील मुलगी आहे. मला एक लहान बहीण असून, आम्ही दोघीही घरी बॅडमिंटन, टेनिस खेळतो. पण कलाविश्वात आल्यानंतर मी माझी स्टाइल स्टेटमेंट थोडी चेंज केली, असं साई पल्लवी म्हणाली.
पुढे ती म्हणते, मी जॉर्जियामध्ये शिक्षण पूर्ण करीत असताना मी टँगो डान्स शिकले. या डान्स प्रकारासाठी एक खास वेगळा पोशाख असतो. या कपड्यांविषयी मी माझ्या पालकांनाही सांगितलं होतं. त्यांनीही ते कपडे परिधान करण्याची परवानगी दिली होती. या काळात मला प्रेमम या चित्रपटाची ऑफर मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मी टँगो डान्स करतानाचा व्हिडीओ मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवर नेटकर्‍यांनी अत्यंत वाईट आणि अश्लील कमेंट केल्या होत्या. त्यामुळे मी लहान कपडे वापरणं सोडून दिलं.

Prakash Harale: