पुणे : यंदाही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने देण्यात येणारा पुरस्कार बासनात गुंडाळण्यात आला. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, त्यानंतर एकाही वर्षी हा पुरस्कार सरकारने घोषित केलेला नाही.
केंद्राकडून १९९२ मध्ये डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराची व पुढे १९९५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली होती.
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम १० लाख रुपये असून डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराची रक्कम १५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आंबेडकरी विचारधारेवर काम करणार्या व्यक्तींना दिला जातो, तर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विषमता व अन्यायाविरोधात लढणार्यांना अथवा एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना दिला जातो.
हे दोन्ही पुरस्कार डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडून दिले जातात. पण, या फाउंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी २०२२ रोजी हे पुरस्कार काही प्रशासकीय कारणांमुळे दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. वास्तविक, २०१५ मध्ये हेच कारण फाउंडेशनने दिले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २००१ नंतर एकाही व्यक्तीला डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. त्यामागेही प्रशासकीय कारणांचा दाखला देण्यात आला होता. डॉ. मनमोेहन सिंग सरकारच्या काळातही हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.
यंदा फाउंडेशनने पुरस्कार नामांकन दाखल करण्याची जाहिरात मार्चच्या दुसर्या आठवड्यात प्रसिद्ध केली होती. म्हणजे अत्यंत कमी वेळ त्यांनी दिला होता. गंभीर बाब अशी, की डॉ. आंबेडकर फाउंडेशनने २०२२ चे पुरस्कार जाहीर केले जाणार नाहीत, याची माहितीही आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवताना अनेक प्रयत्न करावे लागले व संचालक त्रिवेदींनी खुलासा केल्याने माहिती पुढे आली.
डॉ. आंबेडकर यांच्या नावाने दिल्या जाणार्या पुरस्कारांची प्रक्रिया प्रदीर्घ स्वरुपाची आहे. फाउंडेशनकडे नामांकने आल्यानंतर त्यांची तपासणी केली जाते. राष्ट्रपती ज्युरी सदस्यांची निवड करतात, त्यांच्या मताने एखादे नाव निश्चित केले जाते. २०२२ मध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे नाव ज्युरीचे प्रमुख म्हणून घोषित झाले होते. १३ एप्रिलला नावे जाहीर करून १४ तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. गेल्या ३० वर्षांत डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार केवळ ७ जणांना व डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आला आहे.