दुकानदारीच..!

भारतरत्न स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळेच पक्ष उत्साहात साजरी करीत आहेत. मात्र त्यांनी लोकशाहीकरिता लिहिलेल्या संविधानाचे खऱ्या अर्थाने पालन करण्याची प्रबळ इच्छा कोणाची नाही. दुकानदारी सुरू ठेवण्यासाठी अस्वस्थता, अस्वस्थतेतून अस्तित्वाची भीती आणि या भीतीला हुशार मंडळी स्वार्थाकरिता वापरतात. दुकानदारी सुरू करतात. उठताबसता बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्यांनी निदान आजच्या दिवशी तरी ही दुकानदारी बंद ठेवावी एवढेच!

आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावे, या मताशी आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्याचा विचार मविआमधील शिवसेना आणि काँग्रेस कसा करणार हा प्रश्न आहे.

शरद पवार यांच्या गेल्या काही विधानांमुळे काँग्रेस आक्रमक, तर शिवसेना सावध झाली आहे. अखेर शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे हे समजण्यास मार्ग नाही हे नक्की आहे.शरद पवार गेल्या काही दिवसांपासून थेट राजकारणात सक्रिय झाले

आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला, अदानी संदर्भातील जेपीसी, इव्हीएम संदर्भातील मुद्दे, उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजीनाम्यावरून थेट मत प्रदर्शित करणे यावरून महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांची अवस्था नक्कीच भोवऱ्यात सापडलेल्या व्यक्तीसारखी झाली आहे.

शरद पवार नक्की भविष्यकाळात कोणाकडे असतील वा कोणाला पाठिंबा देतील याचा अंदाज दोघांनाही येत नाही. या विचारातूनच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यात हवापाण्याच्या गप्पा, मुलांच्या करियरच्या गप्पा झाल्याचे आणि राजकारणात भूमिका वेगळ्या, पण एकविचाराने काम करावे, यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यावेळी हजर होत्या. या सगळ्याचा अन्वयार्थ आता काँग्रेस कसा काढणार हा मुद्दा आहे.

काँग्रेसने अदानींच्या संपत्तीचा मुद्दा लावून धरला होता, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करताना सावरकर विरोधी मंडळी एकत्र गोळा करायला सुरुवात केली होती. मात्र शरद पवार यांनी या दोन्ही मुद्द्यांना खो घातला आणि काँग्रेसला माघार घ्यावी लागली. आता ते मुद्दे भाजपला फायदेशीर ठरले. सावरकरांच्या गौरव यात्रेमुळे सावरकरप्रेमी एकवटले, मात्र काँग्रेसला सावरकर विरोधाच्या मुद्द्यावर पाठिंबा देणारे राहुल गांधींच्या भूमिकेमुळे विस्कटले. तर अदानींच्या भूमिकेसंदर्भातली हवा पवार यांनी काढल्याने आता राज्यात मविआत जोर फारसा राहाणार नाही. या सगळ्या भूमिका भाजपच्या बाजूने असल्याने मविआतच एकमेकांच्या उलटसुलट वक्तव्ये केली जात आहेत. एकमेकांना इशारे दिले जात आहेत.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आनंदराव अडसूळ गोव्यात जर भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असेल तर आम्ही स्वतंत्रपणे लढणार असे सांगत आहेत. राष्ट्रवादी नको हा शिंदे-शिवसेनेचा नारा आणि ठाकरे यांच्यापासून फुटण्याचे प्रमुख कारण असल्याने भाजपला राष्ट्रवादीला आपल्याबरोबर घेणे अवघड आहे.

अशी परिस्थिती जर न्यायालयाचा अपात्रतेचा निर्णय शिंदे व एकूण १६ जणांच्या विरोधात गेला तरच निर्माण होऊ शकते. उम्मीदपे दुनिया कायम है या उक्तीनुसार शरद पवार या आशेवरच भाजपच्या बाजूने विधाने करताना दिसतात. मात्र शिंदे व साथीदार पात्र राहिले तर राहुल गांधींना यांनी म्यानकेलेली सावरकर-अदानी ही दुधारी तलवार पुन्हा बाहेर काढावी लागेल. त्यातून राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा कमी झाल्याने आता राष्ट्रवादी अस्थिरतेच्या भोवऱ्यातच आहे. तेव्हा ठाकरे व काँग्रेस यांना शरद पवार यांच्या भूमिकेचा विचार करूनच आता रणनीती ठरवावी लागेल. तर भाजपला ताकही फुंकून प्यावे लागेल. एकूणच आज विरोधक एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

कर्नाटकची निवडणूक तोंडावर आहे. नितीश कुमार, राहुल गांधी, तेजस्वी यादव गाठीभेटी घेत आहेत. के. सी. राव तंबूत आदित्य ठाकरे चर्चेस जात आहेत. तर अस्वस्थतेच्या भोवऱ्यात आपसह प्रादेशिक पक्ष आहेत. सबब प्रत्येकाला आता आपल्या अस्तित्वाचा विचार करणे आवश्यक आहे आणि तो केला गेला नाही तर आगामी काळात यांची दुकाने खरोखर बंद होतील यात शंका नाही. त्यासाठीच ही धडपड आहे.

Dnyaneshwar: