पुणे : ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले यांचे सौंदर्य खराब करणाऱ्यांना आता ३ ते ५ वर्षांची शिक्षा होईल. नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी कमी शिक्षा होती, त्यामुळे काेणावर धाक नव्हता. गड-किल्ले यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. पुण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत डॉ. गोऱ्हे यांनी अधिवेशनात झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.
डाॅ. गाेऱ्हे म्हणाल्या, विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली. तब्बल ३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला. कारागृहांच्या संदर्भातील विधेयक, सिद्धिविनायक मंदिराच्या समिती सदस्यांची मुदत ३ वर्षांपासून ५ वर्षे करण्याचा निर्णय, तसेच सदस्यसंख्या ९ वरून १५ करण्याचा निर्णय अधिवेशनामध्ये झाला.