पुणे | Pune Rain – पुणे शहरात काल रात्री (18 ऑक्टोबर) पावसाने धुमाकूळ घातला. सर्व रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले होते. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली. त्याचबरोबर जोरदार झालेल्या या पावसामुळे पुणे स्टेशनला देखील अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते.
काल रात्रभर ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पुणे स्टेशनला तलावाचे स्वरूप आले होते. स्टेशनच्या आतमधील प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ तसंच बाहेरील अंडरग्राउंड ते रस्ते या सर्व ठिकाणी छाती इतकं पाणी साठलं होतं. याच पाण्यातून प्रवाशांनी स्टेशन बाहेर पडण्याचा प्रयत्न चालवला होता.
दरम्यान, पुणे स्टेशनसह पुण्यातील अलका टाॅकीज परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. तर दुसरीकडे कोंढवा, हडपसर, येवलेवाडी भागातही रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कार, दुचाकी चालकांना वाट काढताना कसरत करावी लागत होती.