निवडणूकीपूर्वी नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका

निवडणूकीपूर्वी नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नवाब मलिक हे मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजप पक्ष आग्रही होता. मात्र, भाजपच्या या विरोधाला झुगारुन अजित पवारांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देऊ केला होता. त्यामुळे भाजपकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन मंजूर 

नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. आपले अवयव निकामी झाले असून तातडीच्या उपचाराची गरज आहे, असा दावा मलिकांनी केला होता. परंतु नवाब मलिक यांचा नियमित जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना जामीन देताना हा जामीन फक्त वैद्यकिय उपचारासाठी असेल, असे स्पष्ट  केले होते. पण मलिक विधानसभा निवडणुकीमध्ये उतरले असून ते जोमाने प्रचार करत असून माध्यमांना मुलाखतही देत आहेत. आता मलिकांची प्रकृती पाहता त्यांना वैद्यकिय जामिनाची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणासाठी दिलेल्या जामिनाचा नवाब मलिक गैरवापर करत आहेत, असा दावा ईडीने केला आहे.

नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढवणार 

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांची मुलगी सना मलिक अणुशक्तीनगर या मतदारसंघातून उतरली आहे. मात्र आता ईडीने दाखल केलेल्या याचिकेमुळे लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Rashtra Sanchar: