ईडीकडून गांधी कुटुंबाचा पाठलाग सुरूच; सोनिया गांधींना उद्या पुन्हा समन्स

नवी दिल्ली : कथित नॅशनल हेराल्ड आर्थिक घोटाळ्यात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ( २६ जुलै) पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी पार पडली आहे. याआधी १८ जुलै रोजी देखील त्यांची चौकशी करण्यात आली होती. दोन दिवसात तब्बल ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपकडून सत्तेचा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे असं म्हणत कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचा निषेध केला जात आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सकाळी राहुल गांधी यांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आले होते. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले.

ईडी गांधी कुटुंबाचा पाठलाग सोडणार नसल्याचं चित्र दिसत आहे. उद्या (२७ जुलै) पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांची चौकीशी सुरु असताना कॉंग्रेस नेत्यांकडून ईडी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला होता. दरम्यान, दुपारी युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. तो व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Dnyaneshwar: