शिक्षणाने आयुष्य घडवले आणि जगायला शिकवले

आज मी जी काही आहे ती मी घेतलेल्या शिक्षणामुळेच. कर्नाटकमध्ये जन्मलेली मी वडील महाराष्ट्रीयन असल्यामुळे मुंबईतच लहानाची मोठी झाले. प्राथमिक शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या आयुष्यातील काही टर्निंग पॉइंटमुळे माझे सातवीत असतानाच शिक्षण सोडून लग्न लावून देणार होते किंवा होस्टेलवर राहावे लागणार होते. परंतु प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी माझ्या आई-वडिलांची समजूत काढली आणि सातवीत होणारे माझे लग्न होऊ दिले नाही. नंतर पूर्ण आठवी ते दहावीपर्यंत होस्टेलला राहिले.

दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि घरच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे अकरावीत माझे लग्न झाले. परंतु सासरच्या मंडळींनी शिक्षणाला विरोध केला नाही. संसार सांभाळत लग्नानंतर एक्स्टर्नल शिक्षण पूर्ण केले. खरेच बाईच्या पाचवीला पाटी-पुस्तक, वही पुजली पाहिजे, असे मला वाटते. पीएचडीपर्यंतच शिक्षण पूर्ण करण्याचा माझा हा अट्टहास फक्त मनामध्ये असणारा आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पार पडला. या शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी कधी तर घरातील मुलांचे आवरून मग आपला अभ्यास करणे करावे लागे. एक वेळ अशी आली, आठ-नऊ महिन्यांची गरोदर असताना मला काही पेपर द्यावे लागले.

म्हणतात ना, नाण्याला दोन बाजू असतात सुख आणि दुःख. मी म्हणेल सुखाचे क्षण फार काळ टिकत नसतात, त्यापाठीमागून दुःख येतेच. कौटुंबिक कारणामुळे माझा घटस्फोट झाला आणि मी माझी दोन मुले, मुलगी असा प्रवास पुन्हा शून्यातून सुरू झाला. परंतु कोणत्याही व्यक्तीने खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे, असे मला वाटते. काही काळ पुणे विद्यापीठामध्ये लेक्चरर म्हणून काम केले. या पंधरा वर्षांच्या काळात पीएचडीही शिक्षण पूर्ण केले. सध्या असोसिएट प्रोफेसर म्हणून पुणे विद्यापीठात काम पाहत आहे. याचबरोबर स्थानिक सामाजिक संस्थांसोबत काम करीत असताना समाजातील महिलांचे प्रश्न, मुलींच्या आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न फार जवळून अनुभवता येतात.

मुली आणि मी हे नाते माझे फार जवळचे वाटते. स्त्रीबद्दल सांगायचे झाले तर मी सांगेल स्त्री ही खंबीर कर्तृत्ववान आणि दररोजच्या दुःखाला कंटाळून पुन्हा उभी राहणारी अफाट शक्ती आहे. आयुष्यात दुःख, त्रास येतोच. कधी तुम्हाला शिक्षण सोडावे लागते, तर परिस्थितीला शरण न जाता आपण शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण माणसाला समृद्ध बनवते. माझ्या या प्रवासातून मी अजून एक गोष्ट अनुभवली, की आजही तृतीयपंथीयांना समाजात स्थान नाही. आजही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला नाही. मला या घटकांसाठी काम करायचे आहे. त्याची सुरुवात मी गेल्या काही दिवसांपूर्वी केलेली आहे.

Prakash Harale: