जळगाव : (Eknath Khadse On Devendra Fadnavis) राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला. पत्रकार परिषदेत खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलचं लक्ष केलं आहे. यावेळी खडसे म्हणाले, “माझ्यावर झालेली भूखंडाची कारवाई हा जाणूनबुजून केलेला कट होता. कारण 2019 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख दावेदार म्हणून माझे नाव पुढे येत होते,” असा खळबळजनक दावा खडसे यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुढे खडसे म्हणाले, “मी 2019 च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र, त्याआधीच 2016 रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं गेलं. माझ्याविरोधात घडवून आणलेलं हे एक षडयंत्र आहे. ज्या भूखंडाचा आरोप माझ्यावर ठेवला गेला. त्या भूखंडाशी माझा दुरान्वये संबंध नाही. मी तो जमीन व्यवहार केलेला नाही. शिवाय ती जमीन पाहिलेली देखील नाही. मी फक्त त्या जमीनीबाबत बैठक घेतली होती. त्याचे प्रोसिडिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलं होत. केवळ बैठक घेतली म्हणून माझ्या परिवाराची ईडी चौकशी करण्यात आली. त्याआधी लाचलुचपत विभागाकडून त्याची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीसाठी माझे जावई गेले असता त्याचदिवशी त्यांची अटक करण्यात आली. मला कोर्टाने संरक्षण दिलं असल्यामुळं माझी अटक टळली.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारलं असून तुमचा हेतू शुद्ध नसल्याचे सांगितलं. माझ्यावर अटकेची टांगती तलवार ठेवता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने केली आहे. आयकर विभागाने माझी दोन वेळा चौकशी केली, त्यातही काहीच आढळून आलं नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली, त्यातही काहीच आढळून आलं नाही. तरीही पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. कसंही करुन, काहीतरी सोधून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. पंढरपूर, कोल्हापूर, देगलूरची जागा भाजपने बिनविरोध न करता तेथे उमेदवार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही का? पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत, मी स्वतः चार ते पाच दिवस तिथं प्रचार करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.