“…तर हे दुर्दैवी आहे”, पंकजा मुंडेंनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई | Eknath Khadse Reaction On Pankaja Munde Statement About PM Modi – सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल. त्यांनी मोदींचं नाव नेमक्या कोणत्या अर्थानं घेतलं, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. मला वाटतं त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांचा विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत.”

दरम्यान, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी देखील वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

Sumitra nalawade: