सत्तारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे संतापले, सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचा आदेश?

मुंबई : (Eknath Shidne On Abdul Sattar) राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले आहे. अब्दुल सत्तार यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही तासांपासून हा मुद्दा प्रचंड तापला आहे.

अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर स्वस्थ बसून देणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.

Prakash Harale: