मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक शिवसैनिक आपल्या गटात सहभागी करून घेतले आहेत. अजूनही अनेक नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत. शिंदे गटाकडे सत्ता आल्यापासून शिंदे यांची भाजपचे केंद्रातील नेत्यांशी संपर्क येत आहेत. त्यामुळे आता अनेक शिवसैनिकांची मनस्थिती बदलून शिंदे गटात ते जाताना दिसत आहेत.
अगोदर आमदार, नंतर खासदार आणि नगरसेवक यांना आपल्या गटात घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा मोर्चा शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांकडे वळलेला दिसत आहे. आज (२८ जुलै) सकाळी शिंदे यांनी शिवसेनेचे जेष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली होती त्यानंतर सायंकाळी पुन्हा त्यांनी शिवसेना पक्षाचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली आहे. जोशी यांनी एक पुस्तक देखील शिंदे यांना भेट म्हणून दिले आहे. त्यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चेला उधान आलेलं दिसत आहे.
मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मनोहर जोशी हे शिवसेनेचे प्रमुख नेते असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच कामी येणारे आहेत. त्यांनी दिलेल्या पुस्तकात शिवसेना भाजपच्या युती काळातील योजनांच्या नोंदी आहेत. त्याच योजनांच्या आधारे आता योजना राबविण्याचा सल्ला देखील मनोहर जोशी यांनी दिला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नका असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.