अहमदनगर : (Eknath shinde On Ajit pawar) महिनाभरातील राजकीय सत्तानाट्यानंतर राज्यात बंडखोर शिंदे गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या अनेक विकास कामांना ब्रेक लावण्याचं काम शिंदे सरकार करत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत असताना नामांतरचे तीन ठराव शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले होते. औरंगाबाद-संभाजीनगर, उस्मनाबाद-धाराशिव, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात आले होते. त्या निर्णयाला देखील शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सर्व सामान्यांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला मंजूरी देण्यात आली.
पवारांच्या विकासाचा बारामती पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती नगरपालिकेच्या २४५ कोटी रुपयांची विविध कामे स्थगित करून तत्कालील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना शिंदे सरकारनं जबर दणका दिला आहे. तसाच जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याही मतदार संघातील विकासकामाला ब्रेक लावला आहे. यामुळं असं म्हणता येईल या सरकारनं आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच सुरू केला आहे.