मुंबई : (Eknath Shinde On Devendra Fadnavis) एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह शिवसेनेशी बंडखोरी करुन पक्षाला मोठं भगदाड पाडलं. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु होते. राज्यातील अनेक शिवसैनिकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला असून अजून हे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेनंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून थेट भाजपमध्ये खिंडार पाडण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी भाजपच्या तब्बल 100 महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 च्या भाजपच्या माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह 100 महिलांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा असलेले बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पहिल्या माजी नगरसेविका शितल मात्रे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर बोरिवली आणि दहिसर परिसरामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांनी मोठ्या संख्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोडून शिंदे गटात पक्ष प्रवेश करुन घेतला आहे.