नागपूर : (Eknath Shinde On Devendra Fadnavis) राज्याच्या राजधानी मुंबई आणि उपराजधानी मुंबईला जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लोकार्पणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, त्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. आनंद याचाही आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मी या महामार्गाचे काम करू शकलो. आज आम्ही दोघे एकत्र असताना समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरात बोलताना मत मांडलं आहे.
मोदींच्या दौऱ्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. त्यावेळचा एक अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला. ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली असताना आपण बाजूला बसलो होतो, महामार्गावर प्रवास करताना पोटातलं पाणीही हलत नव्हतं.”, एवढा छान महामार्ग तयार करण्यात आला आहे.
यावेळी ते समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आदी आमदार, खासदार राज्याचे मंत्री उपस्थित होते.