मुंबई : (Eknath Shinde On Maratha Andolan) काल जालन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर तुफान लाठीचार्ज करण्यात आला होता. अनेक आंदोलक आणि पोलिस जखमी झाले. त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला संदेश दिला असून आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हातात घेऊ नये.
शिंदे पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. तरीही आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यामुळे कलेक्टर आणि एसपी तिथे गेले. त्यांना उपचार घेण्यासंदर्भात विनंती करण्यात येत होती. त्याचवेळी आंदोलन पेटलं.