मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) मागील महिनाभराच्या दसरा मेळावा वादावर शुक्रवार दि. 23 रोजी उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर दसरा मेळाव्याला घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य असल्याचं देखील यावेळी न्यायालयाने नमूद केलं.
दरम्यान, या निर्णयामुळे शिवसेनेत उत्साहाचं वातावरण पुन्हा एकदा तयार झाले असून, शिवसेनेपासून फारकत घेतलेला शिंदे गट मात्र यावर नाराज आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितलं आहे.
मात्र, या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रात्री उशिरा एकनाथ शिंदे ठाण्याकडून मुंबईकडे निघाले होते. तेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले “प्रवक्ते बोलतील”, अशा प्रकारची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाची पुढील रणनिती काय असणार हे मात्र, अद्याप समजू शकलं नाही.